Thursday, 19 November 2020

स्वप्ने

 

स्वप्ने

 स्वप्नं तर आपण सतत पहात असतो. अगदी लहानपणापासून. ट्रकड्रायव्हर, वहातुक नियंत्रण करणारा पोलिसा या पासून ते डॉक्टर, इंजिनियर,पायलट पर्यंत. मोठे झाल्यावर पैसाअडका गाडीबंगला, मनासारखा जोडिदार वगैरे वगैरे. काही स्वप्ने पूर्ण होतात पहाटेच्या स्वप्नांप्रमाणे तर काही न आठवणा-या  स्वप्नांप्रमाणे विरुन जातात.

 माझेही एक स्वप्नं आहे. महणाल आता ह्या वयात स्वप्न ? हरि हरि करण्याच्या दिवसात ? अहो वय म्हणजे फक्त एक आकडा. वय तर मनावरच अवलंबून असते आणि स्वप्नं बघायला शारिरीक क्षमतेपेक्षा मनाची उभारी जास्त महत्वाची. मग शरीरात बळ आपोआपच संचारते.

माझे स्वप्न म्हणजे असे काहितरी करावे कि जे मला अतीव समाधान देईल. मग ते चित्र असो, लेख असो किंवा एखादी चांगली पाककृती असो.त्यात मी समरसून जावे. स्वतःला हरवावे. टिक् टिक् करत पळणा-या वेळेचे किंवा काळाचे भान अजिबात नसावे.

आणखी एक स्वप्न मराठी भाषेचे. मराठी भाषा सर्व दूर पसरविण्याचे. त्यासाठी टोस्टमास्टर सारखा एक मराठी क्लब असावा, अगदी रविकिरण मंडळ किंवा तसच काही नव्हे , फक्त साध, शुध्द ओघवती मराठी बोलता यावे सगळ्यांना ह्यासाठी. प्रयत्न केले त्या दिशेने, पावलेही उचलली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. हातातोंडाशी आलेला घास निसटलाच. स्वप्न स्वप्नच राहिले. प्रत्यक्षात आलेच नाही. आता तसंच कोणी पुढे आले तर नव्या जोमाने, ताकदीने तर कदाचित होईल ते पूर्ण . मी अजून आशा सोडलेली नाही. 

एक स्वप्न असे आहे कि जे म्हटले तर पुरे झाले म्हटले तर नाही. फुलपाखराच्या बागेचे. ( बटरफ्लाय गार्डन) सेवानिवृत्त झाल्यावर  दापोली तालुक्यातील गव्हे ह्या गावी उर्वरित आयुष्य शांत निवांत घालवण्याचे, तिथे  फुलपाखरांची बाग फुलवण्याचे स्वप्न. २००६ नंतर तन मन धन आणि पूर्ण वेळ मी त्यासाठी खर्च केला. विविध फुलपाखरांची खाद्य झाडे (फूड प्लांटस) लावली बकुळ, तुती, कढीपत्ता, सुरमाड आणि बरीच. कमळांसाठी  छानशी पुष्करणी ही केली. मस्त तरारली बाग. त्या बागेत तासन् तास बसून निसर्गात रममाण झाले. तिथे पिस्ता रंगाचा तळहाता एवढा ल्युनार मॉथ (पतंग) , त्याच्याही पेक्षा मोठा अटलास मॉथ विविध फुलपाखरांचे सोनेरी कोष ,त्यातून बाहेरच्या जगात पहिल्यादा पंख पसरून उडणारे फुलपाखरू हे सर्व अनुभवले. त्याचबरोबर अनेक पक्षी, सरडे, बेडुक ह्यांचा परिचय झाला. सन् बर्ड रॉबिन भारत्व्दाज हॉर्नबर्ड हळद्या हे मित्र झाले. ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला’ हेही अनभवले. मग ‘म्हटले तर पुरे झाले म्हटले तर नाही’ असे का म्हणाले ? अहो आता दुबईत रहाते. आधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि आता करोननामुळे गेल्या अडीच तीन वर्षात बागेचे दर्शन नाही. फोटो बघून समाधान मानते. दुधाची तहान ताकावर भागवते. शिवाय आत्ताच थैमान घालून गेलेल्या चक्रिवादळातही  बाग तग धरून आहे म्हणून आनंदित होते.

तसच एक स्वप्न शाळेचे. अशी एक शाळा ज्यात पारंपारिक शिक्षण पद्धती नसावी. ह्यत खरेतर नवीन काहीच नाही. टागोरांचे शांतीनिकेतन आणि आता नविन निघणा-याशाळा हेच करायचा प्रयत्न करीत आहेत. पण हयात परवडेल असे काहीतरी असावे. नवीन पिढी संगणक, यूट्यूबच्या जाळयात कोळयाच्या जाळयातल्या माशीप्रमाणे अडकली आहे .तिला जराबाहेर काढावे, हो करोनाच्या दिवसात सुध्दा . मानवाने ऋताला धक्का दिला. तो निसर्गापासून लांब गेला. त्याला निसर्गाजवळ आणावे. आपली संस्कृती आणि धर्म हीच शिकवण देतात ना.

मग संजीवनी ताईंची मराठी शाळा दुबई ही संल्कपना समोर आली. आम्ही ती प्रत्यक्षात उतरवलीही. उद्घाटनाचा पहिला वर्ग निकीता पाटील ह्यांच्या घरी ‘गोल्डन सॅंड’ येथे झाला. नंतर दोन अडीच वर्षे माझ्या घरी दर शनिवारी शाळा भरत असे. पुढे मुलांची संख्या वाढल्यावर आम्ही भरतीय दूतावासात शाळा भरविण्याचे ठरविले व तशी परवानगीही मिळविली. आता मात्र करोनामुळे शाळा ‘झूम’ च्या माध्यमातून ऑनलाईन भरते. छोटीच आहे चाळीस मुलांची. पण उत्साही, व्यासंगी आणि नवीन तंत्रज्ञान जाणणा-या मैत्रिणींमुळे विविध प्रकल्प सादर केले जातात. जसे वेध महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचे संत, किल्ले, सण वगैरे. हयामधून भाषा समृध्द तर होतेच शिवाय मुलांची नाळ आपल्या संस्कृतीशी जुळलेली रहाते. त्यांच्यावर नकळत चांगले संस्कार होतात. तुम्हीही सहभागी होऊ शकता हया स्वप्नात.

तर मी दोन्ही अनुभवले. स्वप्नभंग आणि स्वप्नपूर्ती ही. पण माझ्या मनात एक लहान मूल दडलेले आहे. ते मला नवीन स्वप्न दाखवतेच. खरेतर ह्या स्वप्नांमुळेच आयुष्यातल्या खाचखळग्यांना, चढउतारांना तोंड देत जगण्याची उमेद मिळते. खरे ना ?

 

 

 

रश्मि लुकतुके

No comments:

Post a Comment