समाधानाचे अश्रू
काळची शांत वेळ .एकटीच होती ती घरात हौसेने बांधलेल्या घरात.ज्याच्या आग्रहाखातर कोकणात घर बांधले तो तर सगळ्या आवडीनिवडीच्या पलिकडे गेला होता. सकाळ्ची पूजा आटपून बसली होती. मनात असंख्य आठवणी होत्याच.तेवढ्यात आवाज आला “आहे का कुणी घरात ?”
“आत्ता कोण?” , तिच्या मनात विचार आला. दारात एक तरूण उभा होता.
“पालीच्या कदमला ओळखता तुम्ही?”
“अं कोण?”, ती
“अहो कदम, पाली नि बोरकर मास्तरांची शाळा ” तो तरूण उद्गारला.
खरं तर हजारो मुले हाताखालून गेलेली किती नावे नि चेहरे आठवणार? पण पाली बोरकर मास्तरांची शाळा
ह्या शब्दांनी ती झरकन भूतकाळात गेली.
तिला तिच्या संसाराची सुरुवात आठवली . कोकणातच झालेली. ते शांत दिड दोन हजार वस्तीचे गाव. डाक बंगला,बाजार पेठेतून जाणारा मुंबई गोवा हायवे सगळे डोळ्यासमोर आले. छोट्सच गाव होते. अगदी दोघं फिरयला जोडीने बाहेर पडले तरी गावभर चर्चेचा विषय व्हायचा. दारं खिडक्या आडून डोळे आपला पाठलाग करताहेत ते जाणवायचे.
ती तशी शहरातली. पण नव-याची बदली झाली नि ती पालीत आली. आठवले तिला तिचे पालीतले आगमन. किर्र रात्र.मोटारच्या हेडलाइटमधे दिसणारे पोर्च , जाड खोडांचे मोठे वृक्ष आणि करकरत उघडणारे गेट! अगदी ‘ वह कौन थी’ चा सेट. जरा घाबरलीच होती ती. पण बंगला छान होता. एका क्रिकेटियरच्या बहिणीचा होता. बगल्याच्या अर्ध्या भागात बेंक होती. जाड शिसवी दरवाजे भल्या मोठ्या खोल्या सुन्दर होतं सगळं. आवारात तीन चारशे आंब्याची कलम होती. सहज रमली ती त्यात.
त्या दिवशीही अशीच हाक आली होती.
“आहेत
का वहिनी?”
अरे आत्ता आणि आपल्याकडे ? कोण असेल? तिला प्रश्न पडला. नाहीतर कोकणातली हाक म्हणजे “आहेत का भाऊ नाहीतर साहेब घरात?” बॅंकरच्याकडेच सगळ्याचे काम.
शिसवीच्या दरवाज्यातून ती पडवीत आली . दारात शाळेचे मुख्याध्यापक बोरकर सर उभे होते.
“या ना आत . हे नाहियेत. आज बॅंकेला सुट्टीना?” तिने त्यांना बसयला खुर्ची दिली आणि पाण्याचे तांब्या भांडे पुढे सरकवले.
“आहो तुमच्याकडेच काम आहे आज.”
“माझ्याकडे?”
“हो, पण तेवढे कराच.”
“अहो पण काय ते सांगा तरी सर”
“तुम्ही कय शिकलात?”
‘बी एससी.’ ती उत्तरली
“पण का हो सर?”
“अहो असं बघा ह्या वर्षी अजून ९वी १० वी च्या बॅचला गणीत शिकवायला कोणी शिक्षक मिळालेला नाही. तुम्ही शिकवाल?” सर
“पण सर....”
“नाही नाही मला माहित आहे मुंबईला एका शाळेत शिकवत होतात तुम्ही. एवढे काम कराच.”
“अहो मी बी एड नाही आहे. शिवाय अनुभवही फारसा नाही. माझा मुलगासुद्धा जेमतेम दीड वर्षाचा आहे.”
“तुम्हाला मी काही सूट सवलती देतो” सर
आणि हो नाही करता करता तिने ती जबाबदारी स्विकारली.
मजाच होती सगळी. मुलाचे आटपून मग शाळेत जायची सूट होती. कधी पाहुणे आलेत असा निरोप आला की अर्ध्या दिवसाची रजा. मधल्या सुट्टीत तर ती घरी जाऊन, मुलाला बघून, चहा घेऊन सुध्धा यायची.
दहावीच्या वर्गात पंचवीस विद्यार्थी . तीन मुली नि बावीस मुले. नववीतही तेच. कौलारु शाळा. समोरच झेंडावंदनासाठी चौथरा नि स्तंभ होता. १० वी चा वर्ग एक शेत ओलांडून गेल्यावर!
शिकवायची आवड नि उर्मी असल्यामुळे रात्रीच ती स्वतःचा ‘गृहपाठ’ करायची. मग वर्गात प्रमेय किंवा बीजगणितातली समिकरणे सोडवताना रंगून जायची.
मुलेही मजेशीर होती. एखादाच इस्त्रीच्या गणवेशात. बाकी सर्व धुतलेल्या गणवेशात. सुरुवातीचे दोन दिवस गणवेश छान. नंतर मात्र त्यावर लाल माती किंवा तेलाचे वा रंगाचे डाग ह्यांची नक्षी असायची. प्रत्येकाकडे सर्वसाधारण एकच गणवेश. शिवाय ब-याच वेळा गृहपाठ अपूर्ण ! कारणं तर विचारूच नका. आज शेतात गेलो होतो, घरी पूजा होती, पाहुणे आले होते वगैरे वगैरे. परिक्षांचा बाऊ करणारे शहरी पालक नि आपल्या भोवती घरादाराला नाचवणारे विद्यार्थी कुठे आणि हे चित्र कुठे.
“काय रे अरे पाटी का आणलीस कदम?”
“बाई कच्चे काम करायला.”
“मग रफ वहीत कर”
“पण वही संपेल ना बाई. ही एकच वही उरली आहे”
ती गप्प झाली.कदमची चौकशी केल्यावर कळले त्याच्या वडिलांना बैलाने शिंगाने मारल्यामुळे ते पंगु झाले होते.छोटीमोठी कामे करायचे. कदमही एस टी कॅंटीन मधे शनिवार रविवार काम करायचा.
तिच्या मनात आलं “तरीच ह्याचा गृहपाठ अपुरा असतो.”
एक दिवस तिने त्याला शाळा सुटल्यावर बोलावले नि त्याच्या हातात गुपचुप दोन वह्या व दोन पेनं ठेवली.त्याने काही म्हणायच्या आत नजरेने त्याला गप्प केले नि जायला सांगितले.
दुसर्याच आठवड्यापासून तिच्या लक्षात आले ह्याच वर्गातले लक्ष वाढलंय. कान देऊन ऐकतोय. समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.
घरी नवरा म्हणाला, “ अगं मी कधी नसलो तर बोलाव त्याला सोबतिला. अभ्यास ही घेशील मग त्याचा रात्री.”
त्याच दिवशी ती कदमच्या घरी गेली. घर कसलं मोडकळीला आलेली झोपडीच होती. सारवलेल्या अंगणात डळमळत्या प्लास्टिकच्या खुर्चीत बसून वडील नाराळाच्या झापांची पाने तासत होते. झाडू बनवण्यासाठी. आत जीर्ण जुनेरे लेऊन आई काम करत होती. वडिलांनी तिच्याकडे पाहिले. हताश हरलेले डोळे. तेवढ्यात आई लगबगीने बाहेर आली. आईचे डोळे करारी. तिच्या लक्षात आले पैशाची, मदतीची गोष्ट होता कामा नये. मग म्हणाली,
“मुलगा हुशार आहे तुमचा.”
“हो हाय”
“कोण शिकवतं?”
“त्याचं तोच करतो रातच्याला”
“मी विचारायला आल्ये कि माझे यजमान कहीवेळा कामानिमित्त फिरतीला जातात. त्यावेळी ह्याला सोबतीला पाठवाल का ? एक वर्षाचा मुलगा आहे मला.”
शांतता!
“रात्री शिकवीनही त्याला”
शिकवीन म्हटल्यावर दोघांचे डोळे चमकले आणि आईने पटकन होकार दिला.
कदम यायला लगला. मग हे असतांनाही थांबायला लागला. बारा वाजेपर्यंत अभ्यास करायचा. ती ही मग त्याच्यासाठी घरात केलेली वस्तू आवर्जून खाऊ म्हणून ठेवू लागली. त्याला मुद्दाम दुधातला चहा द्यायला लागली. गुणी मुलगा. शिकवल्याच चीज करू लागला. त्याचा आत्मविश्वासही वाढला. मागच्या बाकावर अंग चोरून बसणारा आता धीटपणे उत्तरे देऊ लागला. वर्गासमोर उभे राहून बोलू लागला. त्याची प्रगती पाहून तिलाच धन्य व्हायचे.
दोन वर्ष हा हा म्हणता गेली. तिच्या मिस्टरांची बदली झाली. कदमने आवर्जून पत्ता घेतला. दहावीचा निकाल कळवीन म्हणाला. पण नापास झाला. कारण वडील वारले, आई आजारी पडली आणि त्याची शाळा हरवली. त्याने पत्रात नोकरी मिळेल का असे विचारले होते. तेव्हा परिक्षांचे लोण फारसं नसल्याने नव-याने त्याला बॅंकेत शिपायाची नोकरी ही मिळवून
दिली. मग मात्र संपर्क तुटला.तो जीवन प्रवाह वळण घेऊन कुठे गेला कळलच नाही.
आणि आज अचानक असा दारात उभे राहून एक अनोळखी तरुण विचारत होता,
“पालीच्या कदमला ओळखता,आठवतो तुम्हाला?”
ती भानावर आली.
“हो हो या ना आत, बसा”
“बसा म्हणू नका बाई. बैस म्हणा” त्याने वाकून नमस्कार करत म्हटले.
“मीच तो कदम” म्हणत त्याने हातातल्या पेढ्यांचा पुडा, साडीची पिशवी आणि शाल तिच्या हातात ठेवली.
“ बाई आज मी जो आहे
तो तुमच्यामुळे आणि सरांच्यामुळे. मुलगाच मी दुसरा तुमचा. बॅंकेत लागलो , परिक्षा दिल्या, स्पेशल असिस्टंट झालो. आता माझा स्वतःचा व्यवसायही आहे
रत्नागिरीत.”
तिला भरून आले. तो गेल्यावर
ती आत वळली. तिने पेढे नि शाल सरांच्या फोटोसमोर ठेवले.
तिच्या डोळ्यात पाणी तरारले. पण दुःखाचे नव्हे
तर समाधानाचे होते ते.
रश्मि लुकतुके
जुलै २०१५